Thursday, September 26, 2013

असेच काहीतरी

तसे मला अनेक प्रश्न सतत पडत असतात.

प्रश्न पडणं हे चांगलं की वाईट हे मला माहित नाही. मला फार प्रश्न उगाच पडतात असे माझे मित्र मला चिडवतात. प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा जरा पोटापाण्याचं बघ असा सल्ला मला नेहमी दिला जातो पण तो मी फारसा मनावर घेत नाही. वीतभर पोटाची भुक भागण्याइतकं कमावलं की माझा महीन्याचा कामाचा कोटा पूर्ण होतो अन मी फुल टू टाईमपास करत राहतो. ह्याचाच एक भाग म्हणजे मी करत असलेला प्रश्नांचा विचार.

आता मनात कोणते विचार कधी आणि कसे येतील याचा काही भरवसा नसतो. कधी असे तर कधी तसे विचार मनात नेहमी गर्दी करत असतात. आता पहा ना मी का लिहितो हा प्रश्न अनेक वेळेला माझ्या मलाच मी विचारला आहे. पण त्याचे काही समाधान कारक उत्तर मिळाले नाही. बर्‍याच दिवसांपूर्वी मी काही संकेतस्थळांवर जात असे. तिथे थोडेफार लिहित असे. कधी मित्रांच्या आग्रहाखातर तर कधी निव्वळ खाज म्हणून त्या संकेतस्थळांव्र मी थोडफार मला माहित असलेलं आणी बरंचसं माहित नसलेलं (हि हा हा ) लिहित असे. काही संकेतस्थळांवरुन मन उडालं तर काही संकेतस्थळांवरुन मला लाथ मारुन हाकललं गेलं. (पुन्हा हशा आणि टाळ्या). आता का हाकललं गेलं ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला लागलो तर महर्षी व्यासांनी लिहिलेल्या महाभारतापेक्षा मोठा ग्रंथ होईल. व्यासांच्या नावावरचा विक्रम मोडायला माझा नकार आहे.कधी तरी सांगेन त्यातल्या दोन चार गंमती आणि तथाकथित आंतरजालीय सज्जनांचे नागडे चाळे. असो.

तर मुद्याची गोष्ट ही की तिथे लिहित असतांना दोन चार मित्रांनी आग्रह केला म्हणून मी कधी तरी वर्तमानपत्रं मासिकं यांत सुद्धा लिहिलं. अजूनही लिहितो. कधी विषय दिलेला असतो त्यावर लिहितो कधी माझ्या डोक्यातल्या विषयावर लिहितो. लिहिलं की बरं वाटतं असा कधी तरी शोध लागला म्हणून लिहित गेलो पण एक दोनदा लक्षात आलं की लिहिल्यावर क्षोम अजूनच वाढला आहे. आता आली का पंचाईत. मग परत काही काळ लिहिलं नाही. पण सालं मळमळ वाढते. मग काय करायचं ? लिहित बसायचं.

तसं मला कागद आणि पेनानेच लिहायला आवडतं. किबोर्डाला बडवून बडवून लिहिण्यापेक्षा कागद पेन जवळचा वाटतो. पण कित्येक वेळेला मी तावच्या ताव लिहिलेले तसेच बाजूला ठेवून दिले आहेत. अन कधीतरी त्याचे रद्दी म्हणून किलोने पैसे मिळवले आहेत.लिहिलेलं कुणी वाचलंच पाहिजे या अपेक्षेला मी पहिल्याच लेखनाच्या वेळेस तिलांजली दिली आहे. त्यामुळे चुकून माकून कुणी वाचलंच आणि त्यावर काही प्रतिक्रिया दिली तर मला बरं वाटत हे जरी खरं असलं तरी त्यावाचून अडत नाही. कुणी वाचत नाही, तु लिहिलेलं छापायला पण देत नाही. मग लिहितो कशाला या माझ्या मित्रांच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही.

आता तुम्ही विचाराल की संकेतस्थळांवर लिहित नाही मग हा ब्लॉग कशाला चालू केलास? मित्रांनो (आणि मैत्रिणींनो) मी का लिहितो या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ब्लॉग कशाला चालू केलास या प्रश्नाचे उत्तर शोधेन म्हणतो. तोवर अधून मधून वाटलंच तर लिहित जाईन इथे असेच काहीतरी.